नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदी भारताची दिग्गज धावपटू पी. टी. उषा यांची निवड निश्चित झाली आहे. या पदासाठी इतर कोणीहीउमेदवारी दाखल केली नसल्याने उषा यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
पीटी उषा यांनी शनिवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. ही निवडणूक १० डिसेंबर ला होणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर अडथळा शर्यतीत अनेक सुवर्णपदके जिंकणा-या आणि १९८५ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवणा-या ५८ वर्षीय उषा यांनी आपल्या ट्विटमध्ये ही घोषणा केली होती. आयओए निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची रविवार शेवटची तारीख होती. आयओए निवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसर उमेश सिन्हा यांनी सांगितले होते की, शुक्रवार आणि शनिवारी एकही उमेदवारी अर्ज आला नाही.