पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आयोगाने समन्स जारी केले आहे. आतापर्यंत या आयोगाकडून राज्यातील महत्त्वाच्या पाच पक्षप्रमुखांना समन्स जारी करण्यात आले आहे. या आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने साक्ष नोंदवली आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणी सुरू असलेल्या कारवाई संदर्भात मत मांडण्यासाठी हे समन्स जारी करण्यात आले आहे. आतापर्यंत शिवसेना, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या पक्षप्रमुखांना आयोगाने समन्स पाठवले असून या या पाचही पक्षप्रमुखांना ३० जूनपर्यंत आपले म्हणणे अॅफेडेव्हिटच्या माध्यमातून मांडावे लागणार आहे. त्यानंतर जबाब नोंदवण्यासाठी बोलवायचे किंवा नाही, यावर आयोग निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
शरद पवारांची साक्ष नोंदवली
भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून त्यांनी तिथले वातावरण बिघडवले होते, तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे, असे पवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची साक्षही आयोगाने नोंदवली आहे.