नांदेड (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, नांदेड जिल्ह्याच्या काही भागास मान्सूनपूर्व पावसाने तडाखा दिला आहे. गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भोकरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली़. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे़
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दोन दिवसांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवला होता. यात नांदेड जिल्ह्यातील काही भागातही विजांचा कडकडाट आणि जोराच्या वाऱ्यासह हलका पाऊस होईल, असे सांगण्यात आले होते.
तो अंदाज खरा ठरला असून गुरुवारी (दि. २६) दुपारच्या सुमारास विदर्भाच्या सीमेसह नांदेड जिल्ह्यातील काही भागास मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले.
यात भोकर शहरामध्ये दुपारी चार वाजताच्या सुमारास वादळी पावसासह शहरातीळ काही भागात गारपीट झाली. आज शहरातील आठवडी बाजाराचा दिवस असल्याने तालुक्यातून आलेल्या भाजी विक्रेत्यांसह लोकांची पावसामुळे तारांबळ उडाली. वादळी पावसामुळे काहींना भाजीपाला न विकता परतावे लागले. यावेळी शहरातील अनेक भागात घरावरील पत्रे उडाली.
तर काही भागातील घरांमध्ये पावसामुळे पाणी शिरल्याचेही पाहायला मिळाले. शहरातील मुख्य रहदारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी साचल्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला़ कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली. हदगाव, भोकर, किनवट, नांदेड, हिमायतनगर आदी तालुक्यातही गुरुवारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या.