जळगाव : मंत्रिपदाचा सट्टा लावून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला, असे खळबळजनक वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा येथे विकासकामांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते.
शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वी उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असल्याचे आपण त्यांना सांगितले होते. मात्र, संजय राऊत यांनी जायचे तर जा असे सांगितल्याने आपणही बाळासाहेबांचे विचार असलेल्या आणि मराठा चेहरा असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतल्याचे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
सत्तेचा प्रयोग फसला असता तरीदेखील मी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असता. नागपूरपासून ते दादरपर्यंत सर्व गेले. त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदारसंघात विकास करू शकलो नसतो, असेही त्यांनी सांगितले.
सात महिन्यांत पाच वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावात आले, हा जोक नाही. असा मुख्यमंत्री आपल्याला कुठेही सापडणार नाही. सकाळी पाच वाजेपर्यंत काम करतात, साधारण माणूस आहे, एकाच ड्रेसमध्ये राहतात असे म्हणत मुख्यमंत्र्यांचे पाटलांनी कौतुक केले.
शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘‘आम्ही मंत्रिपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,’’ असे वक्तव्य केले.
त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढून जोरदार चर्चा होत आहेत. याबाबत भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (१२ मार्च) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
गुलाबराव पाटील ग्रामीण भागातले : चंद्रकांत पाटील
‘गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं ग्रामीण भागात वाढली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत ते बोलले. शहरी भागात जरा पॉलिश करून बोलतात. जसं की, आम्ही ‘रिस्क’ घेतली. त्या ‘रिस्क’ला गुलाबराव पाटील आम्ही सट्टा खेळलो असं म्हटले असल्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.