मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर दुपारी शिवडी दंडाधिकारी कोर्टाने यावर सुनावणी घेत कफ परेड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षकांना २८ एप्रिलपर्यंत तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ममता बॅनर्जीं यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणा-या याचिकेवर नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने दिले आहेत. त्या निर्णयाला ममता बॅनर्जी यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. बुधवारी यावर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पुढे सुनावणी झाली. ज्यात ममता बॅनर्जींच्या वतीने माजिद मेमन यांनी बाजू मांडली. ममता बॅनर्जींविरोधातील याचिकेत काहीही तथ्य नाही. हे सारे प्रकरण केवळ अवहेलना करण्याकरिता राजकीय हेतून दाखल केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. तसेच या मानहानीकारक प्रक्रियेपासून संरक्षण देण्याची ममता बॅनर्जींची हायकोर्टाकडे मागणी केली होती. मात्र जर सत्र न्यायालयाने या प्रकरणी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले तर त्यांच्याविरोधात सध्या कोणतीच प्रक्रिया सुरू नाही, त्यामुळे दंडाधिकारी कोर्टाच्या निर्णयाआधीच या प्रकरणी कोणताही दिलासा देता येणार नसल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले.