परभणी : आगामी दोन दिवसांनंतर हळूहळू जिल्ह्याच्या तापमानात एक ते दोन अंशांनी घट होणार आहे, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ग्रामीण कृषि हवामान विभागाने म्हटले आहे.
परभणीच्या तापमानाचा पारा सध्या ४० अंशांपुढे सरकलेला आहे. जिल्हाभरात उन्हाचा कडाका वाढला आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट आहे. शुक्रवारी परभणीचे तापमान ४१.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.
त्यात शनिवारी थोडी घट (४०.९ अंश सेल्सिअस) झाली. तापमानाचा पारा अजून दोन दिवस असाच राहणार असून, त्यानंतर तापमानात थोडी घट होण्याची शक्यता आहे. तापमान १ ते २ अंशाने खाली येईल, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ग्रामीण कृषि हवामान विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी सांगितले.