सर्वदूर पाऊस, मोठ्या पावसाची प्रतीक्षाच
औरंगाबाद/नांदेड/लातूर : मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असताना मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे जुलै अर्धा संपत आला, तरी अनेक भागांतील पेरणी रखडली होती. मात्र, शुक्रवार दि. ८ जुलै रोजी दिवसभर संततधार सुरू होती. तसेच रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यातच नांदेड, परभणी, हिंगोलीत गेल्या तीन दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू आहे. तसेच औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूरसह इतर जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावल्याने मराठवाडा सुखावला असून, अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने आता पेरणी सुरू होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात काही भागांत अगोदरही पाऊस झाला. परंतु सरसकट पाऊस झाला नसल्याने बहुतांश शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. त्यातच मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस पडत असताना इकडे मराठवाडा कोरडाच होता. त्यामुळे अनेक भागांतील पेरण्या रखडल्या होत्या. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. कारण जुलै महिना अर्धा संपत आलेला असताना पावसाने पाठ फिरवली होती. मागच्या चार-पाच दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. मात्र, पाऊस बरसत नव्हता. अखेर गुरुवारी रात्रीपासून मराठवाड्यातील अनेक भागांत रिमझिम पाऊस सुरू झाला. त्यानंतर शुक्रवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे मराठवाड्यातील शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्याला नेहमीच पावसाची प्रतीक्षा करावी लागते. मात्र, कालपासून या भागात पाऊस पडत असल्याने पेरणीला वेग येणार आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कोकण, मुंबईत जोर कायम
राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच गेल्या २४ तासात कोकणात पावसाचा जोर कायम आहे. तसेच मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही ब-याच भागात पाऊस कोसळत असून, नद्या दुथडी भरून वाहात आहेत.