23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रमलिक यांच्या ८ मालमत्तांवर टाच

मलिक यांच्या ८ मालमत्तांवर टाच

एकमत ऑनलाईन

ईडीची कारवाई, उस्मानाबादमधील १४७ एकर जमीन जप्त
मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाकडून मोठी कारवाई करण्यात आली. ईडीने नवाब मलिक यांच्या एकूण ८ मालमत्तांवर टाच आणली आहे. यामध्ये नवाब मलिक यांची कुर्ल्यातील गोवावाल कंपाऊंड येथील मालमत्ता, उस्मानाबाद येथील १४७ एकरांची जमीन, मुंबईतील ३ सदनिका आणि दोन राहत्या घरांचा समावेश असल्याचे समजते.

ईडीने फेब्रुवारी महिन्यात नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक यांची सातत्याने चौकशी सुरू आहे. या दरम्यानच्या काळात ईडीने त्यांच्या मालमत्तांची माहिती गोळा केली होती. ही सर्व माहिती घेतल्यानंतर ईडीने अखेर नवाब मलिक यांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

नवाब मलिक यांच्यावरील ही कारवाई महाविकास आघाडीसाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ईडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर, प्रताप सरनाईक, प्राजक्त तनपुरे आणि संजय राऊत यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच आणली होती, तर प्राप्तीकर विभागाने मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांची मालमत्ता जप्त केली होती.

नवाब मलिक यांनी आतापर्यंत जामीन मिळवण्यासाठी ब-याचदा प्रयत्न केले. ईडीने आपल्याला केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला होता. याविरोधात आता नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्याकडून त्यांची बाजू मांडली जाणार असल्याची चर्चा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या