34.3 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातही शिरकाव

महाराष्ट्रातही शिरकाव

एकमत ऑनलाईन

मुंबई/अहमदाबाद : अवघ्या जगाची झोप उडवणा-या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा कर्नाटक व गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रातही शिरकाव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या कल्याण-डोंबिवलीच्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे.

नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. या तरुणाला अत्यंत सौम्य लक्षणे असून घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, पण काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, गुजरातमध्येही आणखी एक रुग्ण सापडला. त्यामुळे देशातील ओमिक्रॉन व्हेरिएंटची संख्या आता ४ वर गेली आहे.

नुकताच दक्षिण आफ्रिकेतून परतलेला हा रुग्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. २४ नोव्हेंबर रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला. तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण-डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १२ अतिजोखमीच्या लोकांचा, तसेच या लोकांच्या संपर्कात आलेल्या २३ कमी जोखमीच्या सहवासितांचा शोध घेण्यात आला असून त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

या सर्वांचे अहवाल कोविड निगेटिव्ह आले आहेत. याशिवाय या तरुणाने दिल्ली ते मुंबई प्रवास ज्या विमानाने केला, त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांचीदेखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासीतांचा शोध घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमिक्रॉन आढळलेला नाही. तथापि डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.

मुंबई विमातळावर उतरलेल्या प्रवाशांपैकी ८ जण पॉझिटिव्ह

आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिजोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या १७,१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबरपासून आतापर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.

जनुकीय बदल ही नैसर्गिक प्रक्रिया
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगीकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत. त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

गुजरातमधील जामनगर येथेही सापडला रुग्ण
गुजरातमधील जामनगर येथील व्यक्ती ओमिक्रॉन बाधित झाल्याचे तिच्या चाचणीतून समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेतून ही व्यक्ती परतली आहे. त्यानंतर या व्यक्तीची कोविड चाचणी केली होती. नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी आला असून, त्यात त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गुजरातमधील ही व्यक्ती दोन दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिका येथून परतली होती. विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या रुग्णाला विलगीकरणात ठेवले. या अगोदर कर्नाटकात ओमिक्रोनचे २ रुग्ण सापडले.

बंगळुरुतील रुग्ण झाला बरा
कर्नाटकच्या बंगळुरुमधील ओमिक्रॉनबाधित डॉक्टर आता पूर्णपणे बरे झाले आहेत. प्रचंड शारीरिक वेदना, हलकासा ताप येतो, पण श्वास घेण्यास त्रास होत नव्हता. ऑक्सिजनची पातळीही सातत्याने सामान्य होती, असे त्यांनी सांगितले. त्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा डोस दिला होता. त्यानंतर कोरोनाची लक्षणे जाणवणे बंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी ५६ रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा
देशभरात सध्या ओमिक्रॉन सदृश लक्षणे असलेले जवळपास ५६ रुग्ण असून, त्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळेच सर्वच राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. त्यातही ओमिक्रॉनसाठी जागतिक आरोग्य संघटनेने जे देश हाय रिस्क श्रेणीत टाकले आहेत तिथून येणा-या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या