28.9 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात धमक्यांचे सत्र?

महाराष्ट्रात धमक्यांचे सत्र?

एकमत ऑनलाईन

गृहमंत्री, मंत्री, फडणवीसांची पत्नी, नेते ते सलमान खान टार्गेटवर
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात रोज एकाला धमकी येत असल्यामुळे राज्यातले राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी आली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तीनदा धमक्या मिळाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला सुद्धा धमकी आली. अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत ते थेट सलमान खान या सा-यांना धमक्या मिळाल्या. त्यामुळे हा महाराष्ट्र आहे की बिहार, असा सवाल निर्माण होत आहे.

राज्यातला अति उच्चभ्रू, राजकीय वर्गच सुरक्षित नसेल तर सामान्यांचे काय? त्यांना पुसतो कोण? त्यांच्या जिवाकडे कोणाचे लक्ष असणार? असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण होत आहे. दुसरीकडे या धमक्यांच्या मूळ सूत्रधारापर्यंतही पोलिस अजून पोहोचलेले नाहीत. हे थांबणार केव्हा, असा सवाल आता निर्माण होत आहे.

महाराष्ट्रात सुरू असलेले धमक्यांचे सत्र पाहता आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. राज्याचे गृहमंत्री, त्यांच्या पत्नी, केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री, प्रमुख नेते आणि कलाकार मंडळींना सुरक्षित वाटत नसेल, तर इतरांच्या जिवाचे काय, असा सवाल निर्माण होतोच. बर राजकीय वैरातून हा प्रकार असेल, तर हे टोकाचे वागणे योग्य नाही, इतकी समजही आपल्याला येऊ नये. हे भयंकर आहे. याला सरकार आणि पोलिस लगाम कसा घालणार हे पाहावे लागेल.

थेट गृहमंत्र्यांना धमकी
राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी फोनवरून देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत.

अमृतांना केले ब्लॅकमेल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला बेड्या ठोकल्या. त्यात अनिक्षाला जामीन मिळाला. अनिल जयसिंघानी अजून कोठडीत आहे.
गडकरींना १० कोटी मागितले
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आतापर्यंत जवळपास तीनदा धमक्या आल्या आहेत. २२ मार्च रोजी बेळगाव तुरुंगातून १० कोटींची मागणी करणारा फोन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात आला. विशेष म्हणजे बेळगावच्या कारागृहातून हा फोन केला. त्यासाठी एका तरुणीच्या मोबाईलचा उपयोग करण्यात आला. या तरुणीची विचारपूस केली असता कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळली नाही.

संजय राऊतांना इशारा
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनाही आज धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या मोबाईलवर पाठवलेल्या मॅसेजमध्ये राऊतांची एके-४७ने हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना हिंदूविरोधी म्हटले आहे.

संदीप देशपांडेंवर हल्ला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईत हल्ला झाला होता. या प्रकरणी ‘‘भांडूप कनेक्शन’ समोर आले. दोघांना अटक करण्यात आली. या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी आपल्याला पोलिस संरक्षणाची गरज नसल्याचे म्हटले.
सलमान खानही रडारवर
लॉरेन्स बिश्नोई गँगने अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसे पत्र सलमानचे वडील सलीम खान यांच्या अंगरक्षकाला मिळाले आहे. त्यात सलमानचा सिद्धू मुसेवाला करू, असे म्हटले आहे. या प्रकरणी सलमानच्या तक्रारीनुसार वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आव्हाडांचे कुटुंब टार्गेटवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये आव्हाड यांच्या मुलीला स्पेनमध्ये शूटर लावून शूट करून टाकायचे. अशा धमक्या आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. याप्रकरणी आव्हाड समर्थकांनी महेश आहेर या अधिका-याला मारहाणही केली होती.

अशोक चव्हाणांवर पाळत
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता. अशोक चव्हाण कुठे चालले, गाडीने कुठे जातात, कुणाला भेटतात, यावर पाळत ठेवली जात आहे. याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखं संपवा, अशीही चर्चा सुरू आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

अविनाश जाधव निशाण्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणात नौपाडा पोलिसांमध्ये मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या