मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा करत महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा दिलासा दिला आहे.
राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. धनुष्यबाण आणि शिवसेना गेल्यानंतर ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. मात्र, यापूर्वीच शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करण्याचा सल्ला दिला होता. आज ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांनी ठाकरेंशी चर्चा केली आहे.
आज शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी आगामी कायदेशीर लढ्यांसंदर्भात देखील पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी तुमच्या पाठीमागे पूर्णपणे उभी आहे, असा दिलासा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
राजकीय गोटात खळबळ
एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयानंतर राजकीय गोटातून विविध स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच ठाकरे गटात खळबळ उडाली असून तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
ठाकरेंच्या याचिकेत काय?
उद्धव ठाकरे यांच्या नावाने आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने लोकशाही मार्गाने शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत निर्णय दिलेला नाही. २०१८ मध्ये लोकशाही मार्गानेच शिवसेना कार्यकारिणीची निवड करण्यात आली होती. कार्यकारिणीनुसार पक्षातून कोणालाही काढण्याचा अधिकार हा पक्षाच्या अध्यक्षांना आहे. मात्र, निवडणूक आयोगाने या कोणत्याही बाबींचा विचार न करता शिवसेनेचे नाव व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे.