पुणे : राज्यात उष्णतेच्या लाटांमुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ होऊन विजेचे संकट निर्माण झाले आहे. वीजचोरी किंवा इतर कारणांनी वीजनिर्मिती ते वितरण या दरम्यान होणा-या वीजगळतीचा हातही या संकटामागे आहे. पुणे, नागपूर, भांडुप आदी काही महावितरणचे परिमंडल वगळले तर इतर भागांमध्ये विजेची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. महावितरणची एकूण सरासरी वीजगळती १५.२९ टक्के होत आहे.
जळगाव परिमंडळात सर्वाधिक २६.१८ टक्क्यांची गळती होत आहे. महावितरणची एकूण सरासरी वीजगळती १५.२९ टक्के असून, त्यात काही प्रमाणात वाढ झालेली आहे. राज्यामध्ये महावितरणचे सर्व वर्गवारीतील सुमारे २ कोटी ८८ लाखांहून अधिक ग्राहक आहेत. १६ परिमंडळे, ४४ मंडळे, १४३ विभाग आणि ६३८ उपविभाग मिळून राज्यात विजेचे वितरण केले जाते. या माध्यमातून दरवर्षी सुमारे १ लाख ९ हजार दशलक्ष युनिटपेक्षाही अधिक वीजग्राहकांना पुरविण्यात येते. एकूण ४१ हजार ९२८ गावे आणि ४५७ शहरांना महावितरणकडून विजेचा पुरवठा केला जातो.
या सर्वामध्ये विजेच्या गळतीचे प्रमाणही सर्वात महत्त्वाचे ठरते. २०१० मध्ये महावितरणच्या विजेची सरासरी गळती २० टक्क्यांहून अधिक होती. राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार विजेच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले.
वीजगळती रोखण्याच्या विविध प्रयत्नांंमुळे २०१५ मध्ये सरासरी वीजगळती १४ टक्क्यांच्या आसपास आली होती. मात्र, त्यानंतर त्यात काही प्रमाणात वाढ होत राहिली. गेल्या चार वर्षांपासून गळतीचे प्रमाण वाढले आहे. यंदा राज्याची सरासरी वीजगळती १५.२९ टक्क्यांवर आहे. मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत ती सुमारे दीड टक्क्यांनी अधिक आहे.
जळगाव परिमंडळात
सर्वाधिक २६.१८ टक्के गळती
जळगाव परिमंडळात सर्वाधिक २६.१८ टक्के, त्यापाठोपाठ नांदेड परिमंडळात २५.३२ टक्के, तर अकोल्यास २४.०९ टक्के वीजगळती आहे. सर्वात कमी वीजगळती भांडुप परिमंडळात ६.०६ टक्के, नागपूर, ८.३१ टक्के, तर पुण्यात ९.३२ टक्के इतकी आहे.
परिमंडळनिहाय वीजगळती (टक्क्यांत)
जळगाव-२६.१८, नांदेड-२५.३२, अकोला- २४.०९, लातूर-२३.४३, जळगाव-२१.०७, औरंगाबाद-१७.५४, अमरावती- १६.६७, कोकण-१५.८९, नाशिक-१६.९५, बारामती-१४.१६, गोंदिया-१३.४६, कोल्हापूर-१०.२७, कल्याण-९.७४, पुणे-९.३२, नागपूर-८.३१, भांडुप-६.०६.