24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रदादर-पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले

दादर-पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले

एकमत ऑनलाईन

माटुंगा रेल्वेस्थानकावरील घटना, जीवित हानी नाही, रेल्वे वाहतूक खोळंबली
मुंबई : दादर-माटुंगा स्थानकादरम्यान शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास दादर-पुद्दुचेरी चालुक्य एक्स्प्रेसचे ३ डबे घसरून अपघात झाला. एकाच रेल्वे मार्गावर दोन्ही रेल्वे गाड्या आल्याने गदग एक्स्प्रेसने चालुक्य एक्सप्रेसला धडक दिली. सिग्नल ओलांडल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, दादर-पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे पाठीमागचे ३ डबे रुळावरून घसरल्याने एकच खळबळ उडाली. तसेच या मार्गावरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गदग एक्स्प्रेस ही गाडी नियमित वेळापत्रकानुसार साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी येथून निघाली. याच वेळेस दादर ते पुद्दुचेरी चालुक्य एक्स्प्रेस दादर फलाट क्रमांक सातवरून रवाना झाली. या दोन्ही गाड्या जलद मार्गावरून आपल्या गंतव्य स्थानकांसाठी रवाना होणार होत्या. दादर-माटुंगा स्थानकादरम्यान गदग एक्स्प्रेसने चालुक्य एक्स्प्रेसच्या मागच्या तीन डब्यांना धडक दिल्याने चालुक्य एक्स्प्रेसचे डब्बे घसरले. या दोन्ही गाड्यामध्ये प्रवासी होते, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे अधिका-यांनी दिली.

या अपघातात कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळलेली नाही. घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. लगेचच घसरलेले डबे बाजूला करत वाहतूक सुरू करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

मोठा आवाज येताच
प्रवाशांनी उड्या मारल्या
दोन रेल्वेची धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यामुळे गदग एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातामुळे जलद मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली. मात्र, रेल्वे रुळावरील सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी तात्काळ कामाला लागले होते.

रेल्वे वाहतूक विस्कळीत
माटुंगा रेल्वे स्टेशनजवळील अपघाताने मुंबईबाहेर जाणा-या सहा ते सात एक्स्प्रेस गाड्यांची सेवा खोळंबली. याचा परिणाम लोकल सेवेवरही झाला असून, घरी परतणा-या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच अपघातामुळे जलद अप आणि डाऊन रेल्वे सेवाही बंद ठेवण्यात आली. फास्ट ट्रॅकवरील सर्व लोकल स्लो ट्रॅकवर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्लो ट्रॅकवर मोठा भार आला असून सर्व रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या