यवतमाळमध्ये गारपीट, सांगलीत ओढे, नाले तुडुंब
सांगली/यवतमाळ/लातूर : मान्सूनपूर्व पावसाचा राज्यात धडाका सुरू असून, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातील ब-याच ठिकाणी दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी वादळवारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात तर नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तसेच शेतशिवारात पाणीच पाणी झाले आहे. तसेच आज यवतमाळमध्ये गारपीट झाली. मराठवाड्यातही लातूर, परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी वादळी तडाखा बसल्याने फळबागा आणि उन्हाळी पिकांची हानी झाली आहे. तसेच सांगली जिल्ह्यात वीज कोसळून २४ मेंढ्या दगावल्या आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी वा-यासह चांगलाच पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. मागच्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस झाला. गुरुवारी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात तर अवकाळी पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, नदी, नालेही तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मराठवाड्यातही औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. दुस-या दिवशीही सांगली, यवतमाळसह मराठवाड्यात लातूर, परभणी जिल्ह्यात वादळी वा-यासह पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच अनेक ठिकाणी पिकांची हानी झाली. त्यातच विजेचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक कामे खोळंबली. यवतमाळमध्ये तर गारपीट झाल्याने फळबागांची मोठी हानी झाली.
सांगली जिल्ह्यात वीज पडून
तब्बल २४ मेंढ्यांचा मृत्यू
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे वीज पडून तब्बल २४ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. यात पतंगराव देसाई या शेतक-याचे साडेचार लाख रूपयाचे नुकसान झाले. घटनास्थळी तहसीलदार यांनी तातडीने भेट दिली आहे आणि पंचनामा केला.
लातूर जिल्ह्यात ४ जनावरे दगावली
लातूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. लातूर तालुक्यासह निलंगा, औसा, रेणापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या पावसादरम्यान विविध ठिकाणी वीज कोसळून दोन म्हशी, एक गाय आणि एक बैल अशी चार जनावरे दगावली.
यवतमाळमध्ये गारांचा पाऊस
यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यातच शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कडक ऊन तापल्यानंतर सायंकाळी अचानक वादळी वा-यासह पाऊस सुरू झाला. सुरुवातीला हलक्या स्वरूपात गाराही पडल्या. त्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली.
मोहोळ तालुक्यात दमदार पाऊस
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आठ मंडल कार्यालयाच्या क्षेत्रांत १३८ मिलिमीटर पाऊस वादळी,वारा व विजेच्या कडकडाटासह झाला आहे. पावसाची एकूण सरासरी १७.२८७५ मि.मी. असल्याची माहिती मोहोळ तहसील कार्यालयाने दिली.
आणखी ४ दिवस पावसाचे
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस हे पावसाचे असणार आहेत. यात कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवस मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
१२ ते १५ जूनपर्यंत
मान्सून सक्रीय होणार
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ७ जून ते ८ जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो, तर १२ जून ते १५ जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्याने शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे.