23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रमान्सूनपूर्व पावसाने दाणादाण

मान्सूनपूर्व पावसाने दाणादाण

एकमत ऑनलाईन

मुंबईत लोकलचा खोळंबा, राज्यात ६ जणांचा बळी
मुंबई : राज्यात मुंबई, उपनगरे, ठाणे आणि राज्यातील अहमदनगर, नाशिक, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाने तडाखा दिला. विजांच्या गडगडाटात मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यामुळे विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांत ६ जणांचा बळी गेला. दरम्यान, पहिल्याच पावसात मुंबईत दाणादाण उडाली असून, रुळावर पाणी थांबल्याने लोकलची वाहतूक विस्कळीत झाली.

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात काही ठिकाणी पावसाने गुरुवारी हजेरी लावली. पहिल्याच पावसात लोकलचा खोळंंबा झाला असून ठाणे ते वाशी ट्रान्सहार्बर मार्ग ठप्प झाला. तसेच घाटकोपर स्थानकातही काही वेळेसाठी लोकल ठप्प ली. वाशी आणि सानपाडा स्टेशनदरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने संध्याकाळी ७.१५ पासून ठाणे-वाशी मार्ग बंद झाला. मात्र ठाणे-पनवेल, ठाणे-नेरूळ मार्ग सुरू होता. मध्य रेल्वे मार्गावरदेखील घाटकोपर स्थानकात ठाणे लोकल ठप्प झाली.

कल्याण डोंबिवलीतही गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अंबरनाथ शहरातही सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पाऊस झाला. याशिवाय भिवंडी परिसरात वादळी वा-यात झाड कोसळून नुकसान झाले. परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही. दिवा रेल्वे स्थानकातही रात्री वीज पुरवठा खंडित झाला होता.

नगर जिल्ह्यात चौघांचा बळी
अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने चौघांचा बळी घेतला आहे. दुर्घटनेत वादळी वा-यामुळे भिंत अंगावर कोसळून ३ जण ठार झाले, तर २ जण जखमी झाले, तर दुस-या एका घटनेत झाड अंगावर पडून महिला ठार झाली. संगमनेर तालुक्यात मुंजेवाडी शिवारात ही दुर्घटना घडली.

नाशिक जिल्ह्यात वीज
पडून शेतकरी ठार
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे चक्रीवादळ आणि जोरदार पावसाने तडाखा दिला. संसारी येथे वीज अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच जळगाव जिल्ह्यात चाळीसगावसह रावेर तालुक्यालाही मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. या दरम्यान पाचोरा तालुक्यात वीज कोसळून एका शेतक-याचा मृत्यू झाला.

हिंगोली जिल्ह्यात
केळीबागा उद्ध्वस्त
वसमत तालुक्यातील (जि. हिंगोली) गिरगाव व परिसरात दि. ८ जून रोजी सायंकाळी वादळी वा-यासह पाऊस च गारपिटीने केळी पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी कोलमडून गेला. गिरगाव व खाजमापूर वाडी भागात वादळी वारा, पाऊस, गारपीट झाली. त्यामुळे नुकसान झाले. याशिवाय लातूर, बीड, परभणी जिल्ह्यातही पाऊस झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यात
वीज पडून शेतकरी ठार
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील जेवळी शिवारात वीज अंगावर पडून शेतकरी ठार झाल्याची घटना बुधवार, दि. ८ जून रोजी रात्री उशिरा उघडकीस आली. बलभीम माळाप्पा कागे (५९) असे शेतक-याचे नाव आहे.

नांदेड जिल्ह्यात वादळाचा तडाखा
नांदेड जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री नांदेड शहरासह वादळी पावसाने सलामी दिली. मुखेडमध्ये जोरदार तर उर्वरित तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यात धर्माबादला वादळी तडाखा बसला आणि विजेचे खांब आडवे झाले. झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या