मिरज : नव-याशी घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे वचन देत मिरजेतील पायलटला ९८ हजार अमेरिकन डॉलरला नोयडाच्या महिलेने गंडा घातला. पैसे परत मागितले असता आईकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. याप्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात संबंधित महिलेविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार आतिश शिंगे हे पायलट आहेत. त्यांचा उत्तर प्रदेशातील हिना खान हिच्याशी परिचय झाला. तिने लग्न झाले असल्याचे सांगून पतीशी घटस्फोट घेऊन आपण लग्न करण्याचे वचनही आतिश शिंगे यांना त्या महिलेने दिले. गेली सहा वर्षे शिंगे यांच्या संपर्कात ती महिला आहे.
दरम्यानच्या काळात महिलेने पायलट होण्यासाठी आपणाकडून ९८ हजार २०१ अमेरिकन डॉलर घेतले असल्याची तक्रार शिंगे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली. मुंबई, मिरज व मंगलोर येथे ही रक्कम त्या महिलेने स्वीकारली असे शिंगे यानी तक्रारीत म्हटलं आहे. भारतीय चलनातील या डॉलरचे मूल्य जवळपास ५८ लाख ९२ हजार इतकं होते.
महिलेकडून सातत्याने गंडवागंडवी
या रकमेची परतफेड आपण पायलट झाल्यावर करतो असे त्या महिलेने शिंगे याना सांगत विश्वास संपादन केला. मात्र, आता आपले पैसे परत मिळत नाहीत व ती महिला आपल्याशी लग्नही करत नाही असे लक्षात येताच शिंगे यांनी महिलेकडे पैशाची मागणी करायला सुरुवात केली. त्यावेळी आपण जमिनी विक्री करून देतो, अथवा जमिन नावे करुन देतो असे सांगत त्या महिलेने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.