लखनौ : सिनेमांमध्ये चोरीच्या अनेक कथा आपण पाहिल्या आहेत. पण लखनौमध्ये एक खरीखुरी बॉलिवुड स्टाईल चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आणि या चोरीमध्ये सोने-चांदी किंवा रोकड वगैरे चोरी झाले नसून थेट भारताच्या मिराज-२००० या फायटर जेटचा नवा कोरा टायरच चोरीला गेला आहे.
विशेष म्हणजे ट्रॅफिक जामचा फायदा घेऊन चोरट्यांनी हा टायर लंपास केला असून त्यासोबत ठेवण्यात आलेल्या रिफ्युलर व्हेहिकल, बॉम्ब ट्रॉली, युनिव्हर्सल ट्रॉली, जेटचे मेन टायर यांना चोरट्यांनी हात लावलेला नाही. फायटर जेटचा टायर चोरीला गेल्यामुळे या प्रकारामुळे पोलिसही बुचकळ्यात पडले असून अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सगळा प्रकार घडला २७ नोव्हेंबर रोजी लखनौजवळच्या शाहीन पथ परिसरामध्ये. बक्षी का तालाब परिसरातील एअरबेसवरून जोधपूरच्या दिशेने एक ट्रक २७ नोव्हेंबर रोजी निघाला. हेम सिंह रावत हे हा ट्रक चालवत होते. त्यांचा ट्रक जवळच्याच शाहीन पथ परिसरामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकला. ट्रॅफिक व्यवस्थापन करण्यासाठी अवजड वाहनांना एका बाजूला रांगेत उभे करून एकेक करून सोडण्यात येत होते. पण चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत फायटर जेटचा नवा कोरा टायर लंपास केला.