मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील वाकेड ते चिपळूण दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. मात्र, काही तासांतच हे आंदोलन स्थगित करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित केले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन गुरुवारी सकाळी सुरू केले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ९० किलोमीटरचे रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते महामार्गावर जमले होते. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकारी पत्र घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले.
लेखी आश्वासनानंतर चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मे-जून २०२३ पर्यंत रखडलेल्या महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. ३१जानेवारीपर्यंत काम सुरू होईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. या आंदोलनात खासदार विनायक राऊत, उदय सामंत, आमदार शेखर निकम, चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.