मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना अटक झाल्यानंतर शिवसेनेतील विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे हे राज्यातील एकमेव अडाणी मंत्री आहेत, त्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
पुण्यातील एका उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिले होते. त्यानंतर त्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री जाणार होते पण नावावरून वाद निर्माण झाल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला असून त्यानंतर विनायक राऊतांनी हे वक्तव्य केले आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून फिरणारे एकनाथ शिंदे हे आहेत.
त्यांना शिक्षणाचा पत्ता नाही तर प्रशासन कसे चालवायचे याचे भान नाही. महाराष्ट्रातील एकमेव अडाणी मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख इतिहासात होईल, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, शिंदे हे अडाणी आहेत की काय हे त्यांना लवकरच कळेल. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पण कित्येक लोक आमच्यासोबत येत आहेत. त्यांना वाटते आम्ही महाराष्ट्रात दौरे केले म्हणजे लोक आम्हाला डोक्यावर घेतील पण ते डोक्यावर घेतील की दुसरे कुठे घेतील हे त्यांना माहिती नाही. असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिले आहे.