मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसा पठण करण्याबाबतच्या वक्तव्यानंतर राज्यभरात हनुमान चालिसा पठणावरून महाभारत सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान दिले आहे. उद्या हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचावी, असे रवी राणा यांनी म्हटले आहे. जर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचली नाही, तर ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा वाचणार असल्याचा इशाराही राणा यांनी दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे न उतरवल्यास देशभर हनुमान चालिसा वाजवू असा इशारा दिला आहे. मनसेच्या सुरात सूर मिसळत भाजपही हनुमान चालिसा मुद्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. उद्याच्या हनुमान जयंतीला भाजप नेते मोहित कंबोज लाऊडस्पीकर्सचे वाटप करणार आहेत. त्यांच्याकडे लाऊडस्पीकर्ससाठी ९ हजार अर्ज आले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज ठाकरेंनी भोंग्यांबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर उद्याची हनुमान जयंती राजकीय होणार हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, उद्या म्हणजे, हनुमान जयंतीचे औचित्य साधत पुण्यातील खालकर चौक येथील मारुती मंदिरात उद्या राज यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे. यानिमित्ताने मनसेकडून जोरदार बॅनरबाजी होताना दिसत आहे. मनसेकडून करण्यात येत असलेल्या बॅनर्सवर मनसे प्रमुखांचा हिंदुजननायक असा उल्लेखही करण्यात आला आहे.