मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काही सध्या शाब्दिक चकमक सुरु असल्याचे दिसत आहे. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे म्हणाले ते मी ऐकलं, मी विदर्भातील आहे त्यामुळे समुद्राची पाहणी करायला चाललो आहे असे ते म्हणाले, पण मी अनेकदा बारामतीत गेलो, तिथे मला समुद्र दिसला नाही. शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. माझे वडिल असते तर त्याच वयाचे असते. त्यामुळे मुलगा किती पुढे गेला तरी बापाला असं वाटतं की त्याला कमी समजतं. त्या भावनेतून शरद पवार बोलले असतील. त्याहीपेक्षा मला असं वाटतेय की माझ्या खांद्यावरून, शरद पवार यांना बांद्रयाच्या सिनिअर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची आहे. आणि त्यांना सांगायचेय की बाबांनो काहीतरी करा..अशी टीका शरद पवार यांच्यावर फडणवीस यांनी केली आहे.
कोकण दौऱ्याच्या सुरूवातीला पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली. देवेंद्र फडणवीस हे ११ आणि १२ जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकण दौरा केला आहे. ‘मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल.’ असे म्हणत शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी बोलताना राज्य सरकारने कोकणसाठी दिलेली मदत तोकडी असल्याचे वक्तव्यही फडणवीस यांनी केले. ते म्हणाले की, ‘चक्रिवादळात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे झाडांचा विचार करुन आपल्याला नुकसान भरपाई द्यावी लागेल, १५ हजार रोख द्या अशी मागणी केली होती, ती सरकारने मान्य केलेली नाही. तसेच भांड्यांसाठीही अत्यंत तोकडी मदत केली आहे.’ अनेक गोष्टींचे नुकसान झाले आहे, कोकणासाठी किमान सात ते साडेसात कोटीचे पॅकेज द्यावे लागेल, तरच कोकण परत उभे राहिल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.