22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमराठवाडामुलाच्या हव्यासापोटी विवाहितेचा निर्दयीपणे अवैध गर्भपात

मुलाच्या हव्यासापोटी विवाहितेचा निर्दयीपणे अवैध गर्भपात

एकमत ऑनलाईन

परळीतील घटना, पती, सासू, डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
बीड : स्त्रीभ्रूण हत्येचा कर्दनकाळ ठरलेल्या डॉक्टर सुदाम मुंडे याच्या कृष्णकृत्यानंतर आता पुन्हा एकदा एका विवाहित महिलेचा निर्दयीपणे गर्भपात केल्याची घटना पुढे आली आहे. मुलाच्या हव्यासापोटी विवाहितेचा निर्दयीपणे अवैध गर्भपात केल्याची घटना परळीत उघडकीस आली. या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून सासू, पती आणि डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

परळी येथील शिवाजीनगर भागात राहणा-या सरस्वती नारायण वाघमोडे यांचा दोन वर्षांपूर्वी नारायण वाघमोडे यांच्याशी विवाह झाला. गेल्या वर्षी त्यांना एक मुलगीही झाली, सरस्वती पुन्हा गर्भवती राहिल्याने दुसरा मुलगाच हवा या हव्यासापोटी पती नारायण आणि सासूने बळजबरीने त्यांचे गर्भलिंग निदान केले. त्यामध्ये मुलगीच असल्याचे समजले आणि त्या दिवशीपासून सासू आणि पतीने सरस्वती यांच्याकडे गर्भपात करण्याचा तगादा लावला.

मुलगी आणि मुलांमध्ये भेद न करता सरस्वती यांनी गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे पती नारायण आणि सासू यांच्यासोबत सरस्वतीचा वारंवार वाद होऊ लागला. एके दिवशी सरस्वती आजारी पडल्याची संधी साधून पती आणि सासूने शहरातील स्वामी नावाच्या एका डॉक्टरला घरी बोलावले. तापाचे इंजेक्शन देतो म्हणून डॉक्टरांनी सरस्वतीला गर्भपाताचे इंजेक्शन टोचले.
इंजेक्शन दिल्यानंतर दुस-या दिवशी सरस्वतीला पोटात त्रास होऊ लागला. त्यानंतर सासू आणि पतीने पुन्हा डॉक्टर स्वामी यांना आपल्या घरी बोलावले. आपल्याला गर्भपाताचे इंजेक्शन दिल्याचे सरस्वतीच्या लक्षात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. सरस्वतीच्या गर्भ पिशवीला छिद्र करून गर्भ बाहेर काढावा लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आणि निर्दयीपणाचा कळस गाठून डॉक्टरांनी तिच्या गर्भपिशवीतून कापून गर्भ बाहेर काढला. आपला गर्भपात झाल्याचे कुणाकडे सांगितले तर तुला जिवे मारून टाकू, अशी धमकी सरस्वतीला दिली.

दरम्यान, घडलेला सर्व प्रकार सरस्वतीने पुण्यात राहणा-या आपल्या भावाला सांगितला. त्यानंतर तो तात्काळ परळीत दाखल झाला आणि तो सरस्वतीला आपल्या सोबत पुण्याला घेऊन गेला. तेथे तिची तब्येत अधिकच खालावली आणि अखेर तिने आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी थेट परळी येथील संभाजीनगर पोलिस ठाणे गाठले. आपला बळजबरीने गर्भपात केल्याप्रकरणी पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉक्टर स्वामी आणि प्रक्षा कावळे या चौघांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनीही विलंब न करता या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या