26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रमूळ वेतनात ५ हजारांची वाढ

मूळ वेतनात ५ हजारांची वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमलेली समिती जी काही शिफारस करेल, ती सरकार मान्य करेल, अशी ग्वाही देतानाच हा निर्णय होईपर्यंत एसटी कर्मचा-यांच्या मूळवेतनात ५ हजारांची वाढ करण्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज केली. यामुळे १ ते १० वर्ष सेवा झालेल्या कर्मचा-यांना वेतन व भत्त्यासह ७ हजार २०० रुपये, १० ते २० वर्ष सेवा झालेल्या कर्मचा-यांना मूळ वेतनात ४ हजार रुपयांची, २० वर्षापेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचा-यांच्या मुळवेतनात अडीच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे एस टी महामंडळावर दरमहा साठ कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.

गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचा-यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. विलिनीकरणाची मागणी तात्काळ मान्य करणे शक्य नसल्याने वेतनवाढीबाबत निर्णय घेण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करून परिवहनमंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही याला मान्यता घेण्यात आली.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी एस टी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपा आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्वसहमतीने वेतनवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यानंतर परिवहनमंत्री अनिल परब, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, आ. सदाभाऊ खोत, आ.गोपीचंद पडळकर यांनी सह्याद्री अतिथीगृहात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन वेतनवाढीची घोषणा केली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विलनीकरणाबाबत विचार करण्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. समिती जी शिफारस करेल, ती राज्य शासनास मान्य असेल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

४१ टक्के वेतनवाढ
एसटी कर्मचा-यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ करण्यात येत असून आजवरची ही सर्वात मोठी वेतनवाढ असल्याचे परब यांनी सांगितले. एसटी कर्मचा-यांना राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे महागाई भत्ता व घरभाडे भत्ता दिला जातो. पगारवाढीचे सूत्रही समान ठेवले जाईल, अशी ग्वाही देताना नवीन वेतनवाढीची घोषणा परब यांनी केली.

अशी असेल पगारवाढ १ ते १० वर्ष श्रेणीतील कर्मचारी
-मूळ वेतनात ५ हजारांची वाढ
-मूळ वेतन १२ हजार ०८० रुपयांवरून १७ हजार ३९५ रुपये
-भत्त्यांसह १७ हजार ०८० वरून २४ हजार ५८४ रुपये होईल
-ही जवळपास ७ हजार २०० रुपयांची पगारवाढ

१० ते २० वर्ष श्रेणीतील कर्मचारी
-मूळ वेतनात ४ हजारांची वाढ
-पूर्ण पगार २३ हजार ०४० वरून २८ हजार ८०० रुपये

२० वर्षांवरील श्रेणीतील कर्मचारी
-मूळ वेतनात २ हजार ५०० रुपयांची वाढ
-मूळ वेतन २६ हजार आणि स्थूल वेतन ३७ हजार ४४० वरून ४१ हजार ०४० रुपयांवर
-ज्याचे मूळ वेतन ३७ हजार आणि स्थूल वेतन ५३ हजार २८० होते, त्यांना २५०० रुपयांची वाढ केल्याने मूळ वेतन ३९ हजार ५०० तर स्थूल वेतन ५६ हजार ८८० होईल

१० तारखेच्या आत पगार
गेली दोन वर्षे एसटी कोरोनामुळे फार मोठ्या आर्थिक संकटात आहे. यामुळे राज्­य सरकारने पगारासाठी एसटीला २७०० कोटींची मदत केली आहे. यापुढील काळात कर्मचा-यांचा पगार महिन्याच्या १० तारखेच्या आत होईल, याची हमी सरकारने घेतली आहे.

उद्या कामावर हजर व्हा, निलंबनही मागे
राज्­यातील जनतेचे व एसटी महामंडळाचे हित लक्षात घेऊन कामावर हजर व्हावे, असे आवाहन परब यांनी केले. जे कर्मचारी गावी आहेत त्­यांनी उद्या सकाळी आठ वाजता कामावर हजार व्हावे. जे आंदोलनासाठी मुंबईत आहेत, त्­यांनी परवापासून कामावर हजर व्हावे. तसेच जे निलंबित कर्मचारी उद्या कामावर हजर होतील, त्­यांच्यावरील निलंबन व सेवासमाप्तीची कारवाई रद्द करण्यात येईल, अशी घोषणा परब यांनी केली. मात्र जे हजर होणार नाहीत, त्­यांचे निलंबन कायम राहील, असेही ते म्हणाले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या