मुंबई : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका शेतात सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या इसमाची हत्या झाली असून या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी, मुलगी आणि जावयाला अटक केली आहे. मृताची पत्नी हीच या हत्येची मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या महिलेने मुंबईत स्वत:च्या पतीची हत्या केली. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ६०० कि.मी. प्रवास करून तो मृतदेह इंदूरला आणला. त्यानंतर एका निर्जन स्थळी शेतात पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. या प्रकरणी पोलिसांनी इंदूर ते मुंबई दरम्यान असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिन्ही आरोपी पकडले गेले.
इंदूरच्या राजेंद्र नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी पोलिसांना निहालपूर मुंडी येथील एका शेतात ट्रॉली बॅगमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह सापडला असल्याची माहिती मिळाली. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी कल्याण येथील ६० वर्षीय राजकुमारी मिश्रा आणि तिचा जावई उमेश शुक्ला, मुलगी नम्रता शुक्ला यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा मृतदेह राजकुमारी मिश्रा यांचे पती संपतलाल मिश्रा यांचा असल्याचे निष्पन्न झाले. सखोल चौकशीत महिलेने आपल्या पतीचा डोक्यात वार करून खून केल्याचे सांगितले. घटनेनंतर महिलेने मृतदेह एका ट्रॉली बॅगमध्ये भरून इंदूरला आणून तिचा जावई उमेश यांच्या गाडीमध्ये ठेवला आणि निर्जन जागा पाहून आग लावली.
महिलेचा जावई उमेश हा मुंबईतील एका नामांकित मोबाईल कंपनीत काम करतो. पोलिसांनी गाडी तपासू नये म्हणून त्याने मुलांनाही गाडीत बसवले होते.
पोलिसांनी टोलनाके, हॉटेल आणि ढाब्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनास्थळाच्या जवळच त्यांना एक कार दिसली. टोलनाक्यांवरून तपास करत इंदूर पोलिस उमेशपर्यंत पोहोचले. बुधवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच चौकशीत त्याने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्यावर तिने सांगितले की, तिचा पती संपतलाल मिश्रा याच्याशी काही कारणास्तव वाद झाला होता. शनिवारी दोघांमध्ये बाचाबाची झाली यावेळी महिलेने पतीला ढकलले असता त्याच्या डोक्यात इजा झाली व तो बेशुद्ध पडला. यावेळी पतीला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी त्यांनी बॅगेत भरले. महिलेने संपूर्ण घटना मुलगी नम्रता हिला सांगितली. यानंतर मुलीचा पती उमेशने मृतदेह कारमध्ये ठेवला आणि इंदूरला आणून जाळला. या प्रकरणी आता हत्येत सामील असणा-या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.