नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या चेअरमनपदी केंद्र सरकारकडून मनोज सोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सोनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याने राहुल गांधी यांनी यूपीएससीला यूनियन प्रचार संघ कमीशन असे संबोधले आहे.
राहुल गांधी यासंदर्भात ट्विट केले. यामध्ये ते म्हणतात, यूपीएससी म्हणजे यूनियन प्रचार संघ कमीशन. भारताचे संविधान उद्ध्वस्त केले जात आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विटवर अनेक नेटक-यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी त्यांचे समर्थन केले तर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.
कोण आहेत नवे चेअरमन मनोज सोनी?
मनोज सोनी यांची ५ एप्रिल रोजी यूपीएससीच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्यांनी दोन विद्यापीठांमध्ये कुलगुरु म्हणून काम पाहिले आहे. मनोज सोनी यांनी राज्यशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळविली आहे. मनोज सोनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ असल्याने ते स्वामीनारायण पंथात सामील झाले होते. या काळात त्यांनी अपूर्वानंद हे नावही धारण केले होते. पण कालांतराने ते पुन्हा ऐहिक जीवनात कार्यरत झाले.
सोनी यांच्या नावाला आक्षेप का?
आतापर्यंत यूपीएससीच्या चेअरमनपदी प्रख्यात उच्चविद्याभुषित व्यक्तीची नियुक्ती केली जायची. ज्यांचे अॅकॅडमिक करिअर हे उच्चस्तरीय असायचे. विशेषत: या व्यक्ती प्रशासकीय अधिकारी असायच्या. पण यंदा अशा व्यक्तीची नियुक्ती करण्याऐवजी संघविचाराच्या व्यक्तीची नियुक्ती झाल्याने याला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे.