औसा : तालुक्यातील किल्लारी या भूकंपग्रस्त गावचे रहिवासी असणा-या शुभम संजय भोसले याने यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.त्याने १४९ रँकिंग मिळवित यश संपादन केले आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शुभम हा प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे.
शुभमचे वडील संजय भोसले हे प्राथमिक शिक्षक आहेत. शुभमचे प्राथमिक शिक्षण औसा येथील मुक्तेश्वर विद्यालयात झाले. इयत्ता सातवीपर्यतचे शिक्षण येथे झाल्यानंतर ८ वी ते १० वीपर्यंत लातूरच्या सरस्वती विद्यालयात शिक्षण झाले. त्यानंतर दयानंद विज्ञान महाविद्यालयात १२ वी पूर्ण करून पुढे मुंबई येथे एसपी कॉलेजला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. परंतु पुढे प्रशासकीय सेवेचे ध्येय समोर असल्याने दिल्ली येथे एक वर्षभर क्लासेस केले.
त्यानंतर २०२० मध्ये त्याने परीक्षा दिली. परंतु पहिल्या प्रयत्नात ४ गुण कमी मिळाल्याने यूपीएससीने हुलकावणी दिली. मात्र, त्यामुळे खचून न जाता पुन्हा प्रयत्न चालू ठेवले. परंतु कोरोनाचे संकट आल्याने दिल्ली सोडून औशाला परत यावे लागले. दरम्यान या काळात अभ्यासाची फारशी साधने उपलब्ध नव्हती. मित्रमंडळीशी चर्चा करुन डिजीटल माध्यमे वापरुन अभ्यास केला व २०२१ च्या परीक्षेत शुभम संजय भोसले याने देशात १४९ वा रँक मिळविला.
औशात जल्लोष
शुभम भोसले यांच्या या यशाची बातमी येताच औशात शुभम याचा मित्र परिवार व नातेवाईकांनी जल्लोष केला. येथील लातूर टी पाईटवर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शुभम भोसले यांची मिरवणूक काढण्यात आली होती.
फक्त कष्टाची तयारी हवी
मराठी माध्यमाची मुले ही यूपीएससीत यश मिळवू शकतात. फक्त मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्या यशामागे माझ्या आई, वडिलांचे प्रोत्साहन व सहकारी मित्रांचे मार्गदर्शन हे असून लॉकडाऊन काळात मी घरीच डिजिटल माध्यमातून अभ्यास केला असून माझे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावे, ही अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात १४९ वा रँक मिळविलेल्या शुभम संजय भोसले याने व्यक्त केली.