लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, यावरून वेगवेगळे राजकीय अंदाज वर्तवले जात होते. त्यातच आता उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार कोण याबद्दल प्रियंका गांधींनी उत्तर दिले आहे. युवा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पत्रकारांनी प्रियंका गांधींना राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहरा कोण? मुख्यमंत्री पदाचा कुणी चेहरा दिसतो आहे का? असा प्रश्न विचारला असता, प्रियांका गांधी म्हणाल्या की, आता माझा चेहरा दिसत नाही का? असे म्हणत सुचक इशारा दिला आहे.
काँग्रेसने राज्यात उमेदवारांची निवड करताना महिलांवर लक्ष केंद्रीत केले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या पक्षाच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी लडकी हूं, लड सक्ति हूं मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमे अंतर्गत विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकिट महिलांना दिली जातील, अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी आणखी ४१ उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये १६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने जाहीर केलेल्या दुस-या यादीत पहिल्या यादीप्रमाणेच महिलांचा वाटा ४० टक्के आहे. यापूर्वी १३ जानेवारी रोजी पक्षाने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये सुद्धा ५० महिलांना तिकीटे देण्यात आली होती.