नवी दिल्ली : भारतात निवडणुकीच्या रणनीतीत यशस्वी ठरलेले प्रशांत किशोर यांचे मत आहे की, जोपर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल, महाराष्ट्र, आसाम, हरियाणा, झारखंड या राज्यांत भाजपाचा काँग्रेसशी थेट मुकाबला आहे. तिथे काँग्रेस भाजपाला हरवण्यास सुरूवात करत नाही तोपर्यंत नरेंद्र मोदी सरकारला सत्तेबाहेर काढण्याचा विरोधी पक्षाचा आघाडीचा प्रयोग यशस्वी होऊ शकत नाही.
काँग्रेसला २०० हून अधिक लोकसभा जागांवर प्राधान्य देण्याची गरज आहे जिथे त्यांची थेट लढत भाजपशी आहे, असे प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला सांगितले. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्यातील जुगलबंदी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जोपर्यंत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्याचे निकाल समोर येत नाहीत. तोवर काँग्रेसमध्येप्रशांत किशोर यांच्या प्रवेशावर हायकमांडने वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली होती. मात्र आता विधानसभा निकालानंतर या दोघांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाल्याची कुजबुज आहे.
प्रशांत किशोर यांना २०२४ च्या पूर्वी होणा-या कुठल्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकांची रणनीती आखण्यात रस नाही. काँग्रेसमध्ये नेते म्हणून प्रशांत किशोर पूर्णवेळ भूमिका निभावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तयार करण्याची त्यांची इच्छा आहे. ममता बॅनर्जी, शरद पवार, एमक़े. स्टालिन, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, के. चंद्रशेखर राव, हेमंत सोरेन, जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत प्रशांत किशोर यांचे चांगले संबंध असल्याचे जगजाहीर आहे.