मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज सकाळपासून ईडी चौकशी सुरू आहे. यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत ईडी चौकशीला सहकार्य करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, ‘जेव्हा कोणतीही तपास यंत्रणा आपल्या घरी चौकशीसाठी येते. तपास यंत्रणेला सहकार्य करणे आपली नैतिक जबाबदारी आहे. संजय राऊत ईडी चौकशीला सहकार्य करतील, असा विश्वास आहे.’
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर
राऊतांच्या ईडी चौकशीमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवेळीही काँग्रेस आक्रमक झाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत विरोधकांना दाबण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा विरोधकांकडून आरोप होत आहे. केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर होत असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून करण्यात येत आहे. संजय राऊतांच्या समर्थनार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे.
ईडीचा मुद्दा संसदेत उपस्थित करू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी म्हटले की, ईडी कारवाईच्या घटना सातत्याने घडत आहेत. काँग्रेससोबतही असेच घडले. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा आम्ही संसदेतही मांडला, याआधीही मांडला आहे आणि आता पुन्हा मांडू. कुणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी. तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचे काम आम्ही करू. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनीही वेळोवेळी तपास यंत्रणांना सहकार्य केले आहे.