21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने नवा वाद

राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने नवा वाद

एकमत ऑनलाईन

गुजराती – राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे असे म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वक्तव्य भगतसिंह कोश्यारींनी केले आहे.

काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचे हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यावर राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

राज्यपालांची केंद्राकडे तक्रार करणार- केसरकर
विरोधकांसह शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. राज्यपालांचे वक्तव्य म्हणजे राज्याचा अपमान असल्याचेही ते म्हणाले. केसरकर म्हणाले की, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे कोश्यारींच्या बाजूने अशी विधाने येणार नाहीत, असे निर्देश केंद्राने द्यावेत. मुंबईच्या निर्मितीत प्रत्येक समाजाचा वाटा आहे. यात मराठी माणसांचाही मोठा वाटा आहे. मुंबईच्या औद्योगिक विकासात पारशी समाजाचे मोठे योगदान आहे. राज्यपालांना मुंबईबाबत फारच कमी माहिती असल्याचे या विधानावरून दिसून येते, असे केसरकर म्हणाले.

मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान : संजय राऊत
महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान-अभिमान या नावावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. थोडा जरी अभिमान असेल तरी राज्यपालांचा राजीनामा घ्या, नाहीतर शिवसेनेचे नावही घेऊ नका, असा हल्ला खासदार संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे.

राज्याच्या जनतेची बदनामी : सचिन सावंत
काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले की, राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती, राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वांत आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकीर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.

महाराष्ट्रातील माणूस कर्तबगार आणि सक्षम : मिटकरी
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जिवावर अनेक राज्यं पोसली जातात. आम्ही चटणी-भाकरी खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, असे आमदार मिटकरींनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या