24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यभर अवकाळी संकट

राज्यभर अवकाळी संकट

एकमत ऑनलाईन

पुणे : आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्ष्यद्वीप बेट समूह ते उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून राज्यातील ग्रामीण भागातही शेतक-यांच्या पिकांचे आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच पावसाने यावर्षी उघडीपच घेतली नसल्याने रबी पिकांसाठी आवश्यक असणारे पोषक हवामान लाभले नसल्याने पेरण्याही रखडल्या आहेत. या भागात प्रामुख्याने गहू, ज्वारी, हरभरा, मसूर, कडवे वाल तसेच काही प्रमाणात तुरीचे पीक घेतले जाते. यापैकी काही पिकांना या पावसामुळे नुकसान होणार नसले तरी अन्य पिके मात्र उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून मध्यम आणि तुरळक पावसाला सुरुवात झाली होती. पण दुपारनंतर पावसाचा जोर वाढत गेल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. तर ग्रामीण भागात शेतक-यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, दौंड, शिरूर, जुन्नर तालुक्यात शेतक-यांना पिकांबरोबरच पशुधनही गमवावे लागले आहे. कालच्या पावसानंतर शेळ्या, मेंढ्यांचा गारठून मृत्यू झाला आहे.

पशुधन संकटात
आंबेगाव तालुक्यात धोंडमाळ शिवारामध्ये पावसामुळे व गारव्यामुळे ३० ते ३५ मेंढरं मृत्युमुखी पडली आहेत. शिंगवे येथे (२०-२५), खडकी येथे (४०-४५) मेंढ्या रात्री पडलेल्या पावसामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. पिंपळगाव म्हाळुंगे येथील ३, कथापूर येथील ३२ मेंढ्या रात्री पडलेल्या पावसामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. त्याबद्दल आणखी माहिती घेणे चालू असून पुढील कार्यवाही पशुवैद्यकीय अधिकारी व संबंधित विभागाला करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

खेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे गारठून कोहिणकरवाडी येथे ७ शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील धनगर गिरजू धनू लकडे (मूळ रा. वडगाव सावतळ, जि. अहमदनगर) यांचे मोठे नुकसान झाले आहे. सलग पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या थंडीत मेंढ्या आणि शेळ्या गारठल्या व मृत्युमुखी पडल्या. शेळ्या-मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

जुन्नर तालुक्यामध्ये देखील अनेक ठिकाणी थंडीने व पावसाने गारठून मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याबाबत पंचनामे असून कार्यवाही पशुवैद्यकीय अधिकारी माहिती देणार आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे ४० ते ४५ मेंढ्या मेल्या आहेत. रामदास देवराम शिंदे आणि देविदास भानुदास शिंदे असे मेंढपाळाचे नाव आहे.

नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे पीक संकटात
जिल्ह्यात बुधवारी १७६.६ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पीक मातीमोल झाले. आता रबी हंगामावर अवकाळी संकट दाटून आले आहे. विशेषत: यामुळे द्राक्ष आणि कांदा पिकाचे नुकसान होणार असून, आंब्यालाही याचा तडाखा बसणार आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा शेतक-यांचा घात केला आहे. संकटामागून संकटातून सावरायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडलाय. भात, नागरी, उडीद ही पिके कापून ठेवली आहेत. त्यामुळे रानात पडलेले पीक उचलायचे कसे, त्याची रास कशी करायची असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे.

बीड जिल्ह्यात तूर, हरभरा, ज्वारी अळीच्या विळख्यात
बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे ढगाळ वातावरणाने तुरीला फटका बसला आहे. तर हरभरा, ज्वारी पिके अळीच्या विळख्यात सापडली आहेत. यामुळे शेतक-यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तुरीला ढगाळ वातावरणामुळे फूलगळती होऊन फटका बसला आहे. सातत्याने वातावरण बदलत असल्याने अळीचा प्रादुर्भाव हरभरा, ज्वारी पिकांवर पडला आहे. परिसरतील ज्वारीच्या पोग्याला अळीने भक्ष्य बनविल्याने शेतक-यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सांगली व मिरज भागात मुसळधार पाऊस
गुरुवारी पहाटे अडीच ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मिरज पूर्व भागात ऐन हिवाळ्यात मोठा पाऊस पडला. आंध्र प्रदेश व ओडिशा दरम्यान चक्रीवादळ स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्येही होत आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागासह पूर्ण जिल्ह्यातील काढणीला आलेले व फुलो-यात असणा-या द्राक्ष बागांसाठी व त्या द्राक्ष उत्पादक शेतक-यांसाठी हा पाऊस नुकसान घेऊन आला आहे. एक पाऊस कोट्यवधी रुपयांचे नुकसान घेऊन आला आहे जणू अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

कोकणात आंबा, काजू उत्पादक अडचणीत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर पाऊस कोसळत होता. हवामान विभागाने जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस पाऊस पडणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील भात, आंबा, काजू उत्पादक शेतकरी देखील पुरते अडचणीत सापडले आहेत. गेले काही दिवस असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजूच्या झाडांना आलेला मोहोर गळून गेला आहे. कोकणचे अर्थकारण अवलंबून असते ते आंबा, काजूवर मात्र वातावरणातील बदलांचा मोठा परिणाम यंदा या पिकांवर झाला आहे.

खंडित विजेमुळे वसई-विरार शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
पालघर जिल्ह्यात पाऊस पडत असून बुधवार संध्याकाळपासून पालघर जंगलपट्टी भागात सोसाट्याचा वारा व अतिवृष्टीमुळे येथील वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणा-या सूर्याच्या दोन्ही फिल्टर प्लांटचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे याचा विपरीत परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. त्यातच येथील धुकटन व मासवण फिल्टर प्लांटमधील खंडित वीजपुरवठा जोपर्यंत सुरळीत चालू होत नाही तोपर्यंत गुरुवारी देखील वसई-विरार शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार होता

अहमदनगरमध्ये २० मेंढ्या व कोकरांचा मृत्यू
अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी शिवारात २० मेंढ्या व कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. यात मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात बुधवारी काही प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. याचा फटका मेंढपाळांनाही बसत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या