29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात पहिलीपासून शाळा सुरू होणार

राज्यात पहिलीपासून शाळा सुरू होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज जारी करण्यात आले.

विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या वर्गात १५ ते २० विद्यार्थी एका वर्गात बसतील. एक बाकावर एकच विद्यार्थी बसेल, विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रात शाळा भरावी. एका वर्गात दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे, असे सूचित करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे, एक बॅच पहिल्या दिवशी तर दुसरी बॅच दुस-या दिवशी किंवा सकाळ-दुपार सत्रामध्ये विभागणी करावी. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल, असेही सांगण्यात आले.

शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी कोविड-१९ साठीची ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे. याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. शाळेतील परिपाठ, स्रेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल, अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल, असे स्पष्ट करण्यात आले.

शाळा सुरू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना
शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रिनिंग चाचणी घेण्यात यावी. सद्यस्थितीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक व मदतनीस यांचे १०० टक्के लसीकरण झालेले असावे, असेही म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या