मुंबई : अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घरा-घरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने त्यांच्या रिअल लाइफची नवी इनिंग सुरू करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.
अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अक्षयाने त्याला ‘अहा ऽऽऽ’ म्हणजेच तिने दोघांच्याही नावाची आद्याक्षरे एकत्र करत तेच कॅप्शनसाठी हॅशटॅग म्हणून वापरला आहे.
याशिवाय राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीनेदेखील साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने हे फोटो शेअर करताना त्याला, ‘अखेर साखपुडा पार पडला अहा ऽऽऽ’ असे कॅप्शन दिले आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या साखरपुड्याने चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे. त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांसह अनेक मराठी सेलिब्रेटींनी कमेंट करत त्यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.