ग्वाल्हेर : दबंगांना आमच्या जमिनीवर कब्जा करायचा आहे. यामुळे आमचे जगणे कठीण झाले आहे, असे म्हणत एकाच कुटुंबातील ११ जणांनी इच्छामरणाची मागणी केली आहे. या संदर्भात कुटुंबीयांनी राष्ट्रपतींना उद्देशून पत्रही लिहिले आहे. हा प्रकार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील घाटीगाव तालुक्यातील वीरबाली गावातील आहे.
जितेंद्र अग्रवाल आणि विजय काकवानी नावाच्या दबंगांनी छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हे दबंग १.२ बिघा जमीन जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सर्व्हे क्रमांक १५८४ ही जमीन त्यांच्या नावावर आहे. परंतु, हे लोक वडिलोपार्जित जमिनीवर कब्जा करून वसाहत उभारणार आहेत. या लोकांना समजवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, उलट आम्हालाच ठार मारण्याची धमकी दिली, असे पीडित कुटुंबाचे प्रमुख साबीर खान यांनी सांगितले.
वादग्रस्त जमिनीच्या सीमांकनासाठी दोन महिन्यांपूर्वी तहसीलदारांकडे अर्ज केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तरीही तहसीलदार कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महसूल विभागावरही मिलीभगत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. उदरनिर्वाहासाठी हीच जमीन असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. जमीन गेली तर कुटुंबातील सर्व सदस्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जाईल. राष्ट्रपतींच्या नावाने लिहिलेला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय आणि एसपी कार्यालयाला देण्यात आला आहे. तपास सुरू आहे. ही जमीन कोणाच्या नावावर आहे, याबाबत महसूल विभाग अधिका-यांना पत्र देत आहे, असे एसपी अमित सांघी यांनी सांगितले.