दोहा : फिफाच्या राऊंड ऑफ १६ मधील रोमहर्षक सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने पोलंडचा ३-१ने पराभव करून उपान्यपूर्व फेरीत धडक दिली. स्टार खेळाडू कायलिन एम्बाप्पेने विजयासह मोठा रेकॉर्डही साजरा केला.
या सामन्यात फ्रान्सचा स्टार फूटबॉलर एमबाप्पेने दोन गोल केले. या जोरावर त्याने महान फुटबॉलर पेले आणि रोनाल्डोसारख्या खेळाडूंचे विक्रम मोडीत काढले. लिओनेल मेस्सीच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे.
वयाच्या २४ व्या वर्षी एमबाप्पेने फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. हा विक्रम पूर्वी पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर होता. रोनाल्डोने विश्वचषक कारकिर्दीत २० सामने खेळले. ज्यात त्याने ८ गोल केले. दुसरीकडे, एमबाप्पेने त्याच्या विश्वचषक कारकिर्दीत केवळ ११ सामन्यांत ९ गोल करत रोनाल्डोला मागे टाकले.
मेस्सीशी केली बरोबरी
अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या विशेष विक्रमाशी एमबाप्पेने बरोबरी केली. एमबाप्पेच्या नावावर विश्वचषक कारकिर्दीत ९ गोल झाले असून त्याने मेस्सीच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. एमबाप्पे सध्या फॉर्मात असून कतारमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात त्याने आतापर्यंत ५ गोल केले आहेत. पोलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यातही त्याने फ्रान्ससाठी दोन गोल केले. त्याच्या गोलच्या जोरावरच फ्रान्सने या सामन्यात पोलंडचा ३-१ असा पराभव केला.
फ्रान्सचा पोलंडवर विजय
सामन्यात फ्रान्सकडून एम्बाप्पेने दोन गोल केले. तर पोलंडसाठी कर्णधार रॉबर्ट लेवनडॉस्कीने अखेरच्या क्षणी गोल केला. फ्रान्सकडून गिरूडने ४४ व्या मिनिटाला पहिला गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. यानंतर एमबाप्पेने दोन गोल करीत फ्रान्स संघाच्या वीजयावर ३-० असे शिक्कामोर्तब केले. उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्ससमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे. हा सामना १० डिसेंबर ला होईल.