नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वनक्षेत्रांमधील आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र नष्ट होऊ लागल्याचे वास्तव समोर आले आहे. शहराजवळील बोरगड, पांडवलेणी, रामशेज, मातोरी या परिसरात आगीच्या घटना घडल्या आहेत. आता नाशिक व इतर भागातील वनपट्ट्यात आगीच्या घटना घडण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच त्र्यंबक वनपट्ट्यातील रोहिले डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. या आगीत बरीचशी वनसंपदा जळून खाक झाली आहे.
दरवर्षी नाशिक शहराजवळील डोंगररांगांसह जिल्ह्यातील वनक्षेत्र असलेल्या त्र्यंबक डोंगररांगांना आग लागल्याच्या घटना घडतात. मार्च सुरू झाला की आग लागण्याचे प्रकार घडतात. यात हजारो हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक होते.
परिणामी इथे वास्तव्यास असलेले प्राणी, पक्षी, वन्यप्राणी आदींचा होरपळून मृत्यू होतो. काही दिवसांपूर्वीच मातोरी परिसरात मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याची घटना घडली. त्यानंतर काल सायंकाळी त्र्यंबक तालुक्यातील रोहिला डोंगरास सहा वाजेच्या सुमारास आग लागली. यानंतर सुमारे आठ तासांहून अधिक काळ ही आग धुमसत होती. रोहिले डोंगरास आग लागण्याचा प्रकार चिंताजनक आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यात अनेक डोंगररांगा आहेत. तसेच वनसंपत्ती आणि नैसर्गिक वनौषधी मोठ्या प्रमाणात आढळून येते. परंतु गत काही वर्षांपासून वनक्षेत्रांमध्ये वणवा लागण्याचा धोका सातत्याने वाढत आहे.