उपमुख्यमंत्री पाठक यांचे संकेत
भदोही : वृत्तसंस्था
त्रेतायूग काळातही उत्तर प्रदेशचे अस्तीत्व असल्याचे दाखल ग्रंथांमध्ये आहेत. या प्रदेशात पूर्वी लखनपूर आणि लक्ष्मणपूर नावाने ओळखले जाणारे शहर नंतर लखनऊ झाले. त्यामुळे या शहराचे लवकरच लक्ष्मणपूर नावाने नव्याने बारसे केले जाणार असल्याचे संकेत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बुधवारी दिले.
भदोही दौ-यावर आले असता यावेळी उपमुख्यमंत्री पाठक यांच्याहस्ते सुरियावा येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी साधलेल्या संवादात पाठक म्हणाले, त्रेतायुगात श्रीरामांनी आपला भाऊ लक्ष्मणला हे शहर भेट दिले होते. तेव्हापासून हे शहर लखनपूर आणि लक्ष्मणपूर नावाने ओळखले जायचे. पुराणांमध्ये तसे दाखलेही आढळतात.मात्र शहराचा नवाब असफ-उद-दौला यांनी लखनऊ असे त्याचे नामकरण केले. ते बदलून लखनऊला जुनी ओळख द्यावी, अशी मागणी खासदार संगम लाल गुप्ता यांनी ही मागणी केली होती, असेही उपमुख्यमंत्री पाठक म्हणाले.