औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एका लग्नसमारंभा दरम्यान झालेल्या एका आगळ्यावेगळ्या चोरीची घटना समोर आली आहे. लग्न विधी सुरू असताना याचाच फायदा घेत एका अल्पवयीन चोरट्याने चक्क आहेराचा डबा लांबविल्याची घटना शुक्रवारी वाळूज परिसरात समोर आली आहे. या आहेराच्या डब्यात एकूण २५ हजार रुपये होते. आहेराचा डबा लांबविणारा अल्पवयीन चोरटा व त्याचा साथीदार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूरच्या समीक्षा संजय जैस्वाल हिचा शुक्रवारी पहाडसिंगपुरा येथील धनराज जैस्वाल या तरुणासोबत नगर रोडवरील हॉटेल ए. एस. क्लबमध्ये विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्नसमारंभात वधू-वराकडील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. दरम्यान लग्नात आलेल्या नातेवाईक व मित्रमंडळींनी वधू समीक्षा हिला आहेर म्हणून काही रोख रक्कम दिली होती. आहेराचे पैसे एका स्टीलच्या डब्यात जमा करून लग्नमंडपातच हा डबा ठेवला होता.
समीक्षा आणि धनराज यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर वधू-वर फेरे घेत होते. त्यामुळे लग्नात आलेल्या नातेवाईक व मित्रमंडळींचे लक्ष वधू-वराकडेच होते. याचाच फायदा घेत एक १२ ते १४ वर्षे वयाचा मुलगा लग्नमंडपात ठेवलेला आहेराचा डबा घेऊन फरार झाला. लग्नसोहळा पार पडल्यानंतर काही व-हाडी पुन्हा आहेर करत असताना आहेरचा डबाच गायब असल्याचे समोर आले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.