19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeआंतरराष्ट्रीयलवकरच पृथ्वीचा ‘ब्लॅक बॉक्स’ तयार होणार

लवकरच पृथ्वीचा ‘ब्लॅक बॉक्स’ तयार होणार

एकमत ऑनलाईन

मेलबर्न : एखाद्या विमान अपघातानंतर तो अपघात नक्की कसा घडला, याची माहिती विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ देत असतो. तसेच आता भविष्यात जर पृथ्वीचा विनाश झाल्यास त्यानंतर पुन्हा निर्माण होणा-या मानवांना त्याबाबत माहिती मिळण्यासाठी हा ‘ब्लॅक बॉक्स’ उपयोगी पडणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या तस्मानियामध्ये हा ‘ब्लॅक बॉक्स’ तयार केला जात आहे.

पृथ्वीच्या आणि मानव संस्कृृतीच्या पतनाची कहाणी रेकॉर्ड करू शकणारा हा ब्लॅक बॉक्स जवळपास ३२ फूट लांब असेल. कधीही नष्ट न होऊ शकणा-या स्टीलपासून हा ब्लॅक बॉक्स ऑस्ट्रेलियाच्या तस्मानियामध्ये तयार करण्यात येणार आहे. ब्लॅक बॉक्समध्ये हवामान बदल आणि इतर मानवनिर्मित धोक्यांचीही नोंद होऊ शकेल. सौरऊर्जेवर हा ब्लॅक बॉक्स काम करेल. हा ब्लॅक बॉक्स तयार करण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, याचा मात्र अद्याप अंदाज आलेला नाही.

मार्केटिंग कंपनी ‘क्लेमेंजर बीबीडीओ’ तस्मानिया विद्यापीठाच्या मदतीने या प्रकल्पावर काम करत आहे. ३२ फुटांचा स्टील ब्लॅक बॉक्स हार्ड ड्राइव्हने भरलेला असेल, ज्यामध्ये पृथ्वीच्या विनाशाची संपुर्ण माहिती कोणत्याही पक्षपाताशिवाय नोंदवली जाईल. हा ब्लॅक बॉक्स तापमान, समुद्र पातळी, हवामानातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण यासहीत हवामानातील डेटाही संकलित करू शकेल.

प्रलयातून वाचलेल्या मानवांना कळणार माहिती
पृथ्वी नष्ट झाली तर हा ब्लॅक बॉक्सचा उपयोग काय? असा प्रश्न नक्कीच अनेकांना पडला असेल. तर संशोधकांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी नष्ट होऊनही त्यातून कुणी वाचले तर तो मानव या ब्लॅक बॉक्सचा वापर करू शकेल. पृथ्वीवर प्रलय आला तरी मानवाचा एखादा छोटा समूह जिवंत राहू शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. आग, पूर आणि दुष्काळ यांनी मानवी संस्कृतीचा अंत कसा केला? याविषयी हा मागे राहिलेला मानवी समूह माहिती घेऊ शकेल.

पुढील वर्षापासून सुरु होणार काम
ब्लॅक बॉक्स तयार करण्याचे काम २०२२ च्या मध्यात सुरू होईल. १९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘२००१ : ए स्पेस ओडिसी’ या चित्रपटात दाखवलेल्या ब्लॅक मोनोलिथप्रमाणे हा ब्लॅक बॉक्स असेल. ब्लॅक बॉक्स उभारणीसाठी तास्मानिया आधी माल्टा, नॉर्वे आणि कतारमध्ये उभारण्याविषयीही चर्चा झाली होती. परंतु, तस्मानियाची भू-राजकीय आणि भू-वैज्ञानिक स्थिरता अधिक चांगली असल्याने या ठिकाणाची निवड करण्यात आली. तस्मानियामध्ये सूर्य उगवल्यानंतर सौर ऊर्जेच्या मदतीने वैज्ञानिक डेटा रेकॉर्ड केला जाईल. यात समुद्राची पातळी, तापमान, महासागराचे आम्लीकरण, कार्बन डायऑक्साइड, जीवांचे विलोपन, जगाच्या विविध ठिकाणी जमिनीच्या वापरात बदल इत्यादींचा समावेश असू शकेल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या