झाडे उन्मळून पडली, पत्रेही उडाली
लातूर : लातूर शहर व परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वा-याचा वेग अधिक असल्याने बार्शी रोडवरील एमआयडीसी पोलिस ठाण्याजवळील झाड रस्त्यावर कोसळले. तसेच शासकीय वसाहतीच्या परिसरातही झाड तुटून रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यासोबतच औसा रोडवरही रस्त्यावर झाड कोसळले. याशिवाय अनेक ठिकाणी पत्रे उडाल्याने नुकसान झाले.
लातूर परिसरात रविवारी दिवसभर प्रचंड उकाडा होता. सायंकाळी आकाशात ढग जमा झाले आणि सायंकाळी ५ च्या सुमारास वादळी वा-यासह पाऊस सुरू झाला. अचानक आलेले वादळ आणि पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळाचा वेग अधिक असल्याने लातूर शहरात अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली, तर पत्रेही उडाल्याने बरेच नुकसान झाले. तसेच नागरिकांचीही चांगलीच तारांबळ उडाली.
विशेष म्हणजे शहर परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी मोठ-मोठी होर्डिंग्ज लावण्यात आली होती. तसेच ट्यूशन क्लासेसचेही होर्डिंग्ज लावण्यात आली होती. ते होर्डिंग्जही फाटल्याने ते अस्ताव्यस्त झाले. वा-याचा वेग अधिक असल्याने पावसाचे थेंबही जोरात लागत होते. त्यामुळे ऐनवेळी नागरिकांचीही चांगलीच धावाधाव झाली, तर वाहनधारकांना जागेवरच वाहने थांबवून सुरक्षितस्थळी धाव घ्यावी लागली.