नवी दिल्ली : शिंदे आणि ठाकरे गटासाठी सोमवार खूप महत्त्वाचा आहे. याचे कारण दोन्ही बाजूंचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर लेखी युक्तीवादासाठी उद्याचा (सोमवार, दि. ३०) शेवटचा दिवस आहे. सोमवारी दोन्ही बाजूंनी लेखी म्हणणे मांडल्यानंतर काही दिवसांत यासंबंधी निर्णय लागू होऊ शकतो.
गेल्या वेळी सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी पक्षाच्या घटनात्मक मुद्यावर एकमेकांवर आरोप केले होते. त्यानंतर ३० जानेवारीपर्यंत आपले म्हणणे मांडण्यासाठी आयोगाने मुदत दिली होती. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाकडून सोमवार, ३० जानेवारी रोजी निवडणूक आयोगात लेखी स्वरूपात काय काय मुद्दे मांडले जातात, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. उद्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी तर होणार नाही. हे युक्तिवाद लिखित स्वरूपात मिळाल्यानंतर पुढच्या काही दिवसांत निवडणूक आयोग चिन्हाबाबतचा आपला अंतिम निकाल देऊ शकतो.