नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्करप्रमुख असतील. विद्यमान लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे एप्रिल महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. नरवणे यांच्यानंतर लष्करात मनोज पांडे सर्वात वरिष्ठ आहेत. त्यामुळे लष्कर प्रमुख पदाची सुत्रे नरवणे यांच्याकडून पांडे यांच्याकडे जातील.
पांडे लष्करामध्ये इंजिनीयर विभागात कार्यरत आहेत. इंजिनीयर विभागातून आतापर्यंत एकाही अधिका-याला लष्करप्रमुख पदापर्यंत मजल मारता आलेली नाही. मात्र तो मान मनोज पांडेंना मिळणार आहे.
जानेवारी २०२२ मध्ये मनोज पांडे यांची चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. नरवणे यांच्यानंतर लष्करात तेच सर्वात वरिष्ठ आहेत. त्यामुळे लष्करप्रमुख पदाची धुरा त्यांच्याकडेच सोपवली जाईल अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती. डिसेंबर १९८२ मध्ये पांडे कोर ऑफ इंजिनीयर्समध्ये रुजू झाले. त्यांनी आर्मी वॉर कॉलेज, महू आणि दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये हायर कमांड कोर्समध्येही सहभाग घेतला आहे. त्यांनी ३७ वर्षे लष्करात सेवा दिली आहे. ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रममध्ये त्यांचा सक्रीय सहभाग घेतला होता.
लष्करात अनेक विभाग
लष्करात विविध विभाग आहेत. इन्फंट्री, आर्टिलरी, आर्मर्ड, इंजिनीयर असे विविध विभाग लष्करात महत्त्वाची भूमिका बजावतात. या विभागांमधील वरिष्ठ अधिकारी पुढे लष्करप्रमुख होतात. इन्फंट्री, आर्टिलरी, आर्मर्ड विभागातील अनेक अधिका-यांनी आतापर्यंत लष्करप्रमुख पद भूषवले आहे. मात्र इंजिनीयर विभागातून आतापर्यंत एकही अधिकारी लष्करप्रमुख पदापर्यंत पोहोचलेला आहे. मनोज पांडेंच्या रुपात पहिल्यांदाच इंजिनीयर विभागातील अधिकारी लष्करप्रमुख होईल.
मार्चच्या अखेरीस मोठे फेरबदल
चालू वर्षात लष्करातून अनेक बडे अधिकारी निवृत्त झाले. लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती, लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी ३१ जानेवारीला निवृत्त झाले. त्यानंतर मार्च अखेरीस लष्करात मोठे फेरबदल झाले. लेफ्टनंट जनरल एस. एस. महल यांनी शिमल्यात एआरटीआरएसीचे नेतृत्त्व हाती घेतले. लेफ्टनंट जनरल सी बन्सी पोनप्पा यांनी लष्कराशी संबंधित एडजुटेंट जनरल पद हाती घेतले. लेफ्टनंट जनरल जे. पी. मॅथ्यूज यांनी उत्तर भारत विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून कार्यभार स्वीकारला.