गोवा कॉंग्रेसमध्ये बंडाचा प्रयत्न, कॉंग्रेस प्रभारींनी केली कारवाई
पणजी : महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे ६ ते १० आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. राजकीय घडामोडी घडत असताना गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी आमच्या पक्षाच्या काही नेत्यांनी भाजपसोबत मिळून कट रचल्याचा आरोप केला. काँग्रेसला राज्यात कमजोर करून पक्षांतर करण्याचा कट होता. काँग्रेसचे आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांनी कट रचल्याचा आरोप दिनेश राव यांनी केला. त्यामुळे गोव्याच्या विरोधी पक्षनेतेपदावरुन मायकल लोबो यांना हटवण्यात आले. आमच्यासोबत ५ आमदार असल्याचे ते म्हणाले.
गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद तनवडे यांनी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळले आहेत. काँग्रेसकडून अशा गोष्टी केल्या जातात, असे प्रत्युत्तर सदानंद तनवडे यांनी सांगितले. गोव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ११ आमदार निवडून आले होते, तर भाजपने पुन्हा सत्ता मिळवली होती. जर १० आमदारांनी पक्ष सोडला तर पक्षासोबत केवळ १ आमदार राहू शकतो. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे, अशा चर्चा आहेत. दोन्ही नेत्यांनी याला दुजोरा दिलेला नाही. गोवा काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीला केवळ तीन आमदार उपस्थित होते. गोव्यातील एका हॉटेलमध्ये ७ आमदारांची बैठक झाली होती. त्या बैठकीला दिगंबर कामत आणि मायकल लोबो उपस्थित नव्हते.
भाजपसोबत जाण्यासाठी
४० कोटींची ऑफर
गोवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडनकर यांनी काँग्रेसच्या ३ आमदारांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ४० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा केला. ही ऑफर उद्योगपती आणि कोळसा माफियाने दिल्याचा दावा त्यांनी केला. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आमदारांवर दबाव आणला जात आहे. आमदारांनी ही माहिती काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांना दिली.