27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयवचनपूर्ती हेच हिंदुत्व, भक्ती हीच शक्ती

वचनपूर्ती हेच हिंदुत्व, भक्ती हीच शक्ती

एकमत ऑनलाईन

मुंबई : अयोध्येत २०१८ मध्ये येऊन पहले मंदिर फिर सरकार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. आजही मी श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. ही तीर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नव्हे. वचनपूर्ती हेच आमचे हिंदुत्व आहे आणि भक्ती हीच शक्ती आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यात केले.

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, राजन विचारे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह शिवसेनेचे नेते व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आदित्य ठाकरे यांनी ही राजकीय नव्हे तर तीर्थयात्रा असे विधान केले असले तरी या दौऱ्यात शिवसेनेने मोठय़ा प्रमाणात राजकीय शक्तीप्रदर्शन केले. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी जूनच्या पहिल्या आठवडय़ात अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यास प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा जाहीर झाला होता. मात्र राज ठाकरे यांचा दौरा उत्तर प्रदेशातील भाजपा नेत्याच्या इशाऱ्यानंतर रद्द झाला. आमचे राजकारण स्पष्ट व स्वच्छ आहे. हिंदुत्व आम्ही कधीही सोडले नाही. रघुकूलरित सदा चली आयी, प्राण जाए पर वचन न जाए.. जे वचन आम्ही देतो ते आम्ही पूर्ण करतो. निवडणुका असो वा नसो, निवडणुका जिंको किंवा हरो, आम्ही वचन पूर्ण करतो. वचनपूर्ती हेच आमचे हिंदुत्व आहे, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तसेच अयोध्येत येणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांची सोय व्हावी यासाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्यात केली होती. त्यानुसार आता १०० किंवा त्यापेक्षा अधिक खोल्यांचे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र देणार असून त्यांच्याशी चर्चाही करतील, असे आदित्य यांनी जाहीर केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या