29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeवसमत तालुक्यात बँक लुटीचा प्रयत्न अयशस्वी

वसमत तालुक्यात बँक लुटीचा प्रयत्न अयशस्वी

कॅश नसल्याने संतप्त चोरट्यांचा गोळीबार, तीन चोरट्यांना अवघ्या दोन तासांत अटक

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यात वसमत तालुक्यातील चोंडीआंबा येथे शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेवर चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॅश नसल्याने बँक लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दरम्यान, संतप्त दरोडेखोरांनी बँकेवर गोळीबार करून धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेचच शोधाशोध सुरू केली आणि अवघ्या दोन तासांत आखाडा बाळापूर हद्दीत तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. यातील २ आरोपी उत्तर प्रदेशातील, तर एक आरोपी वसमतचा आहे.

चोरट्यांनी बँकेत प्रवेश करून बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यावेळी चोरट्यांनी रागाच्या भरात बँकेच्या दिशेने गोळीबार केला. बँकेत रोकड नसल्याने हा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. एक गोळी बँकेच्या काचावर लागली. चोरट्यांनी बँकेच्या दिशेने एकूण तीन गोळ््या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच स्वत: पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, उपाधिक्षक किशोर कांबळे, कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार गजानन भोपे, करवंदे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी बँकेतील माहिती घेण्यासोबतच सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत जिल्ह्यात नाकाबंदी केली. पोलिसांनी तत्परतेने बँकेचे सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींना अटक करण्यासाठी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला.

उसाच्या फडात मुसक्या आवळल्या
दरम्यान घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी आखाडा बाळापूर पोलिसाना माहिती दिली. आखाडा बाळापूर पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड व पोलिसांनी आरोपी आयाज अहमद गजूर (३०) व्यवसाय लिफ्ट काम सोमवार पेठ वसमत जिल्हा हिंगोली, संदीप मटरु यादव (२२) व्यवसाय लिफ्ट काम (जि. वाराणसी उत्तर प्रदेश), शाबान जमीला अन्सारी (२२) व्यवसाय लिफ्ट काम (रा. नानपारा,जि. बहरिच, उत्तर प्रदेश) यांना रामेश्वर तांडा येथून पुढे बोथी शिवार, भोसीकडे जात असताना एका उसाच्या फडाजवळ दुचाकी सोडून पळून जात असताना कुरुंदा व आखाडा बाळापूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली.

१५ दिवसांपूर्वी बँक
मॅनेजरच्या घरी दरोडा
पंधरा दिवसापूर्वी हिंगोली येथील बँक मॅनेजर अविनाश कल्याणकर यांच्या घरी बंदुकीचा धाक दाखवून व त्यांच्या पत्नीव मुला बाळांना मारहाण करून चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कम पळवली होती. याबाबत काल दोन चोरट्यांना पकडले असून, मुद्देमालासह दोन गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले. या घटनेचा विसर पडत नाही, तोच हिंगोली जिल्ह्यात दुसरा लुटालुटीचा प्रकार घडला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या