अत्याचार प्रकरणाला वेगळे वळण
औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते महेबुब शेख यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने जिन्सी पोलिस ठाण्यात लग्न करण्याचे आमिष दाखवून अत्याचार करून व्हीडिओ तयार करणा-या नदिमोद्दीन अलीयुद्दीन उर्फ नदीम फिटर (३६) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे या व्हिडीओच्या सहाय्याने संबंधित महिलेला महेबुब शेख याच्या विरोधात खोटी तक्रार करण्यास भाग पाडल्याची माहिती फिर्यादीत देण्यात आली. या फिर्यादीत आमदार सुरेश धस आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नावांचा उल्लेख आहे.
संबंधित महिलेने आरोपी नदीमोद्दीन अलीयुद्दीन शेख (मालेगाव येथील कथित नगरसेवक) याने बलात्कार करून व्हीडिओ बनविला व खोटी केस करण्यास भाग पाडले. नाशिकमध्ये खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न फसल्याने औरंगाबादेत गुन्हा दाखल केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महेबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड येथे पीडितेला धस यांच्या हॉटेलमध्ये नेण्यात आल्याचा उल्लेख आहे. तेथे सुरेश धस आणि मीडिया प्रतिनिधींशी भेट झाल्याचा उल्लेख करÞण्यात आला आहे. तक्रारीत संबंधित महिलेने सुरेश धस यांनी लिहून दिल्याप्रमाणे मीडियाला माहिती दिल्याचे म्हटले तर, चित्रा वाघ यांनी मीडियाशी कसे बोलायचे हे शिकवल्याचादेखील फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे.