औरंगाबाद : राज्यात सत्ताबदलाचे वादळ आले असताना अनेक जिल्ह्यांतून याचे पडसाद पहायला मिळत आहेत. औरंगाबादेत आज भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोठमोठे बॅनर्स लावले आहेत.
आगामी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या मुख्य पूजेचा मान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच मिळाला पाहिजे, अशी मागणी करणारे हे बॅनर्स शहरात लावण्यात आले आहेत. राज्यात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार असून एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे.
महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वर्षा बंगला सोडला आहे. लवकरच ते राजीनामा देतील, अशीही दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
येत्या १० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी आणि भाविकांच्या नजरा आता पंढरपुरातील वारीकडे लागल्या आहेत. कोरोना संकटानंतर यंदा प्रथमच मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत.
आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची मुख्य पूजा करण्याचा मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असतो. सत्तेवर असलेले मुख्यमंत्री सपत्निक विठ्ठल- रुक्मिणीची पूजा करतात. याच पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत. ‘माऊली, तुझा आशीर्वाद राहू दे.. तुझ्या पंढरपूरच्या यात्रेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ देत’असा मजकूर या बॅनर्सवर लिहिला आहे. शहरातील जालना रोडवरील पुलाच्या खांबांवर हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.