नवी दिल्ली : आम्हाला यंदा होणारी प्री-युनिव्हर्सिटी परीक्षा द्यायची आहे. पण, हिजाबबंदीमुळे देता येणार नाही. त्याचा अनेक विद्यार्थिनींवर परिणाम होईल. आमचे भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचे असेल तर तुम्हाला अजूनही संधी आहे, असे आवाहन कर्नाटकातील हिजाब बंदीविरोधातील लढ्यातील प्रमुख विद्यार्थिनीने आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना केले.
हिजाब घालून परीक्षेत बसण्याची परवानगी देण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. आमचे भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्याची तुम्हाला आणखी एक संधी आहे. आम्ही देशाचे भवितव्य आहोत. कृपया आम्हाला हिजाब घालून परीक्षा हॉलमध्ये बसू द्या, असं ट्विट मुख्यमंत्री बोम्मई यांना टॅग कत आलिया असदी या विद्यार्थिनीने केले. हिजाब बंदीविरोधात न्यायालयात धाव घेणा-या याचिकाकर्त्यांपैकी आलिया असादी ही एक विद्यार्थिनी आहे.
कर्नाटक सरकारने ५ फेब्रुवारी रोजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली होती. याविरोधात कर्नाटकातील अनेक शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. नंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. जिथे न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व प्रकारच्या धार्मिक पोशाखांवर तात्पुरती बंदी घातली होती. यानंतर राज्याच्या अनेक भागांत हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनी आणि शिक्षकांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली होती. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल दिला. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबंदी योग्यच आहे. हिजाब घालणे इस्लाम धर्मात सक्तीची प्रथा नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.