मुंबई : विराट कोहलीने मोक्याच्या क्षणी मोठी खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. विराटच्या ७३ धावांच्या जोरावर आरसीबीने गुजरातचे १६९ धावांचे आव्हान ८ गडी राखून पार केले. गुजरातकडून राशिदने दोन विकेट घेतल्या, तर फाफ ड्युप्लेसिसने ४४ धावांचे योगदान दिले. ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूत नाबाद ४० धावा चोपल्या. त्यानेच आरसीबीच्या विजयाला तडाखेबाज तडका दिला. गुजरातकडून कर्णधार हार्दिक पांड्याने दमदार ६२ धावा केल्या. आरसीबी या विजयानंतर गुणतालिकेत १६ गुण मिळवत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.
गुजरातचे १६९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीने दमदार सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिसने दमदार सलामी दिली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये आरसीबीला ५५ धावांपर्यंत पोहोचवले. यात विराटचा ३४ धावांचा वाटा होता. पॉवर प्लेनंतर सावध खेळत असलेल्या फाफ ड्युप्लेसिसने गिअर बदलला. दरम्यान, विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण करत आपण फॉर्ममध्ये परतत असल्याचे मोठे संकेत दिले. या दोघांनी १२ व्या षटकात नाबाद शतकी मजल मारली.
दरम्यान, फाफ ड्युप्लेसिस आपल्या अर्धशतकाजवळ पोहचत असताना राशिद खानने त्याला ४४ धावांवर बाद केले. दुसरीकडे विराट कोहलीने सत्तरी पार केली होती, तर आरसीबी १५० च्या उंबरठ्यावर होती. मात्र राशिदने आरसीबीला अजून एक धक्का दिला. त्याने विराट कोहलीला ७३ धावांवर बाद केले. विराट बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने १८ चेंडूत ४० धावा चोपत गुजरातच्या १६९ धावा १८.४ षटकात पार केले.