मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण या घोषणांवर विरोधकांनी टीका केली. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा आहे, अशी टीका केली. त्यांच्या या टीकेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी ठाकरेंच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
‘‘खरं म्हणजे गाजर हलवा तरी आम्ही देतोय. त्यांनी काहीच दिलं नाही. त्यांनी स्वत: खाल्लं, दुस-याला उपाशी ठेवलं. मी त्याच्यात जात नाही. आम्ही जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो वस्तुनिष्ठ आहे. याचे परिणाम तुम्हाला दृश्य स्वरूपात दिसतील. कामं सुरू होतील. आकडे फुगवण्यासाठी आम्ही हे केलेलं नाही. आम्ही फक्त कोरडी आश्वासनं दिलेली नाहीत. तर शेतक-यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत’’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी पत्रकारांनी शेतक-यांसाठी वीज बिल माफी करण्याबद्दल काही निर्णय झाला नसल्याबाबत विचारले, त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘वीज बिल माफीचं काय? मागच्यावेळेस अधिवेशनात घोषणा केली. पण अधिवेशनानंतर वीज कापली. असे आमचे सरकार करणार नाही. स्वत: उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे कुठल्याही शेतक-यावर अन्याय होणार नाही. या शेतक-यांच्या मागे उभे राहण्याचे काम सरकारने केलेले आहे.’’
‘‘या अर्थसंकल्पात आम्ही प्रत्यक्षात दाखवून दिलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काही उत्तरच नाही. त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. अरे हे आकडे, योजना, काय-काय चाललंय? आम्ही काहीच शिल्लक ठेवले नाही. त्यांची बोलती बंद झाली आहे. सगळे महामंडळ, सर्व समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही केलेले आहे. पोटदुखीचे कारण काय?
त्यांच्याकडे बोलायला जागा नाही. त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांचा एकदम करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी करून टाकला. गेल्यावेळेस आपण पाहिले की, मागच्या सरकारमध्ये शेतक-यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. पण त्याची पूर्तता केली का? ती पूर्तता आम्ही केली. आम्ही ते पैसे दिले. त्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता केली. आम्ही पळ काढलेला नाही’’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.